पुणे प्रतिनिधी | पुण्यातील पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण रोज एक नवीन नवीन वळण घेत असतानाच आता विशाल अग्रवाल ला मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर मधील अग्रवाल याच्या MPG क्लब मधील अनधिकृत बार गुरुवारी सील करण्यात आला.
महाबळेश्वरमध्ये सुरेंद्रकुमार यांच्या नावाने महाबळेश्वर पारसी जिमखान्यामध्ये क्लब आणि रिसॉर्ट असून, हा क्लब बेकायदेशीर असून तो अनधिकृत रित्या चालवत असल्याबाबत च्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता अनेक त्रुटी समोर आल्या. त्यांच्या अहवालानंतर सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं MPG क्लबचा बार अखेर सील करण्यात आला आहे. अग्रवाल याचं हॉटेल अनाधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर हा बार सील करण्यात आला आहे.
रिसॉर्टचे प्रकरण नक्की काय आहे ?
पूर्वी महाबळेश्वर मध्ये पारशी जिमखाना नावाची एक ट्रस्ट होती. या ट्रस्टच्या मालकीची हि पंचतारांकित असलेल्या हॉटेलची मिळकत आहे. २०२० साली विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हि मिळकत त्याच्या नावावर केली. ट्रस्टची जागा त्यांच्या नावावर कशी झाली? ट्रस्टला क्लबची ही प्रॉपर्टी विकण्यासाठी परवानगी होती का ? असे अनेक प्रश्न आहेत. एकंदरीतच काय तर ही प्रॉपर्टी अनधिकृत पणे नावावर केलेली असू शकते असा संशय व्यक्त केला जात आहे. याच ट्रस्ट च्या जागेवर आता मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट क्लब व बार सुरु करण्यात आले होते व ते अग्रवाल यांनी दुसऱ्याला भाडेतत्वावर दिलेले होते.
यापूर्वी सुद्धा पालिकेत बऱ्याच तक्रारी झाल्या होत्या..
महाबळेश्वरमध्ये अग्रवाल यांनी शासकीय जागेत फाईव्हस्टार दर्जाचं हॉटेल बांधलं आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून हे हॉटेल उभारण्यात आल्याबाबत महाबळेश्वर नगरपालिकेत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या तरी पण यावर अजूनही कारवाई झाली नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले होते..
गुरूवारी माध्यमांशी संवाद साधत महाबळेश्वर मधील हॉटेलप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल याच्या कुटुंबाने जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधलं असेल तर त्यावर बुलडोझर फिरवावा. अशा सूचना पोलीस व पालिका प्रशासनाला दिल्या आहेत, त्यावरून प्रशासन आता active मोड ला आले आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरवर मधील एक शासकीय जागा भाडेतत्वावर घेऊन त्या ठिकाणी विशाल अग्रवाल यांनी पंचतारांकित हॉटेल सुरू ठेवले आहे. एमपीजी क्लब हे विशाल अग्रवाल यांचे हॉटेल असून सरकारी जागेवर हे हॉटेल बांधलं आहे आणि ते भाडेतत्वावर दिले आहे. या याठिकाणी सुरू असलेल्या बार विरोधात महाबळेश्वर पालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतकेच नाही तर महाबळेश्वरपालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा बार बंद करण्याची आणि हाॅटेल सील करण्याची मागणी करण्यात आली आहे